रस्त्यावर वाळू पडलेली असेल कार, दुचाकी घसरते हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. पण आधीच काहीच ग्रिप नसलेल्या रेल्वेच्या चाक आणि रुळावर वाळू टाकली जाते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. पण हे खरे आहे. असे का केले जाते याची अनेकांना माहिती नसते. यामागे एक महत्वाचे कारण आहे.
भारतीय रेल्वे असे का बरे करत असेल... का त्यांना प्रवाशांच्या जिवाची पर्वा नाहीय का? अहो प्रवाशांच्या जिवाची पर्वा आहे म्हणूनच तर धावत्या रेल्वेच्या चाकांवर वाळू टाकली जाते. रस्त्यावर घसरण्यास कारणीभूत ठरलेल्या या रेतीचा वापर ट्रेन थांबविण्यासाठी केला जातो.
रेल्वे ठराविक अंतराने किंवा ब्रेक लावताना चाकांवर वाळू टाकली जाते. रुळही लोखंडाचे आणि चाकही लोखंडाचेच असते. ते घासून घासून एवढे तुळतुळीत असते की ते पुढे जाण्यासाठी किंवा थांबण्यासाठी ग्रिप पकडू शकत नाही. यामुळे रेल्वे रुळ आणि चाकामध्ये वाळूचे कण टाकले जातात. जेणेकरून त्यांच्यातील घर्षण वाढते.
हे केव्हा केले जाते...जेव्हा ट्रेन चढणीला असते किंवा उताराला असते. जेव्हा ट्रेन अचानक किंवा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावले जातात, अशा वेळी रेल्वेचे चाक आणि रुळावरील घर्षण वाढविण्यासाठी चाकाजवळच्या सँड बॉक्समधून ही वाळू हळूहळू टाकली जाते. यामुळे या ट्रेन न घसरता सुरक्षित रित्या थांबतात किंवा पुढे जातात.