दक्षिण कोरियातील एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कहाणी मूळ भारतीय असलेल्या महिलेने गर्भवती काळात कोरियाच्या सरकारने कशाप्रकारे तिला आर्थिक मदत केली त्याचा हिशोबच मांडला आहे. अनेकांनी तिच्या कहाणीचं कौतुक केले आहे.
ही एक भारतीय महिला असून तिचे लग्न दक्षिण कोरियातील नागरिकासोबत झाले आहे. तिने एक व्हिडिओ बनवला, ज्यात तिने कोरियात गर्भवती झाल्यामुळे मला पैसे मिळाले असं सांगितले. व्हिडिओतून तिने कोरिया सरकारकडून कसे आणि किती पैसे मदत मिळाली याची सविस्तर माहिती दिली आहे. महिलेच्या गरोदरपणाची पुष्टी झाल्यावर कोरियन सरकारने तिला सुमारे ६३,१०० रुपये दिले. हे पैसे डॉक्टरांकडून तपासणी, औषधे आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी होते. याशिवाय, बस, ट्रेनसारख्या सार्वजनिक सुविधांचा आरामात वापर करता यावा म्हणून सरकारने आणखी ४४,०३० रुपये दिले.
महिलेने जेव्हा मुलाला जन्म दिला त्यानंतर कोरियन सरकारने तिला आणि तिच्या पतीला १.२६ लाख रूपये एकरकमी दिले. या मदतीमागील हेतू नव्या पालकांना सुरुवातीच्या खर्चात कोणतीही अडचण येऊ नये असा होता. सरकारची मदत ही फक्त एकदाच मिळणारी गोष्ट नव्हती तर पुढेही त्या महिलेला दरमहा पैसे मिळत राहिले. मुलाच्या पहिल्या वर्षासाठी दरमहा ६३,१०० रुपये, दुसऱ्या वर्षासाठी दरमहा ३१,००० रुपये, मुलगा दोन वर्षांचा झाल्यानंतर मूल आठ वर्षांचे होईपर्यंत दरमहा १२,६०० रुपये देण्याचे कोरियन सरकारने आश्वासन दिले आहे.
दक्षिण कोरियामध्ये जन्मदर खूप कमी होत आहे. लोक लग्न आणि मुलांचे नियोजन उशिरा करत आहेत. म्हणूनच पालकांना मुलांचे संगोपन करण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने २०२० पासून नवीन योजना सुरू केल्या. व्हायरल झालेला व्हिडिओ @mylovefromkorea17 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. ही कहाणी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली आहे. 'भारतातही अशा योजना असाव्यात,'हे खूप चांगले मॉडेल आहे, इतर देशांनीही ते स्वीकारले पाहिजे असं लोक प्रतिक्रिया देत आहेत.