मुंबई : आजवर केवळ ५०० रुपयाच्या नोटेकडे संशयाने पाहिले जायचे; पण आता बनावट नोटा बनिवणा-या टोळ्यांनी आपला मोर्चा १०० आणि एक हजार रुपयांच्या नोटांकडेही वळविला असून यामुळे बाजारात अधिकच गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भात सावधानतेचा इशारा दिला असून, ग्राहकांना या मूल्याच्या नोटा स्वीकारताना आणि त्यांचे व्यवहार पडताळताना बारकाईने या नोटांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे.बनावट नोटांची आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच प्रसिद्ध केली असून यानुसार बनावट नोटांची निर्मिती करणाऱ्या टोळ्यांनी ५०० रुपयांच्या नोटांची निर्मिती जोमाने सुरू ठेवली असून, ३१ मार्च २०१४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ५०० रुपयांच्या दोन लाख ५२ हजार बनावट नोटा पकडण्यात यश आल्याचे शिखर बँकेने नमूद केले आहे. त्या अगोदरच्या आर्थिक वर्षात बँकिंग व्यवस्थेने ५०० रुपयांच्या सुमारे दोन लाख ८१ हजार बनावट नोटा पकडल्या होत्या. मात्र, ५०० रुपयांच्या नोटांसोबत आता १०० आणि एक हजार रुपयांच्या बनावट नोटांची निर्मिती करून त्या चलनात आणण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक हजार रुपये मूल्याच्या तब्बल एक लाख दहा हजार नोटा, तर १०० रुपयांच्या तब्बल एक लाख १८ हजार नोटा पकडण्यात बँकिंग व्यवस्थेला यश आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. टक्केवारीत सांगायचे तर एक हजार आणि १०० रुपये या दोन्ही नोटांच्या बनावट करून त्या चलनात आणण्याचे गेल्या दोन वर्षांत प्रमाण १०० टक्क्यांनी वाढले आहे. (प्रतिनिधी)
हजाराच्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट
By admin | Updated: September 1, 2014 00:34 IST