अर्जेंटीना या देशाची ओळख जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंसाठी ओळखला जातो. दियागो मॅराडोना, लिओनेल मेस्सी यांचे चाहते अगदी क्रिकेटवेड्या देशांमध्येही आहेत. याच अर्जेंटीनामध्ये एक रंग बदलणारी नदी आहे, जी प्रदुषणामुळे कधी लाल, कधी हिरवी तर कधी पिवळी होते. सरड्यासारखा रंग बदलणारी ही सारंडी नदी आहे, असे तिच्या नावावरून म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयर्स शहराजवळून वाहणाऱ्या या नदीचे पाणी आता अचानक लाल झाले आहे. यामुळे स्थानिक लोक चिंतेत आहेत. पर्यावरण संरक्षित क्षेत्राला लागूनच असलेल्या या नदीत असे काय घडत आहे की या नदीचे पाणी वेगवेगळे रंग धारण करत आहे. अर्जेंटीनाच्या पर्यावरण विभागाने या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
स्थानिकांनुसार या नदीच्या काठावर चामड्याचे आणि कपड्याचे कारखाने आहेत. तेथून या नदीच्या पाण्यात विवध रसायने सोडली जातात. हा कचरा रासायनिक प्रक्रियेमुळे पाण्याचा रंग बदलतो, असा त्यांचा आरोप आहे. अनेकदा या नदीच्या पाण्यातून घाण वास येत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. परंतू, याकडे कधीही सरकारने लक्ष दिलेले नाही, असेही ते म्हणतात.
या नदीच्या रंग बदलण्याचा प्रकार काही आजचा नाही. यापूर्वीही या नदीच्या पाण्याचा रंग बदललेला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. कधी निळा, कधी हिरवट, कधी गुलाबी किंवा वांगी कलर असेही रंग या नदीमध्ये दिसले आहेत. अनेकदा पाण्याच्या वर तेलासारखे तरंगही दिसले आहेत. अशा कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. २०२१ मध्ये दक्षिण पॅटागोनिया प्रदेशातील एका तलावाचे संपूर्ण पाणी गुलाबी झाले होते, तेव्हा साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले होते.