नवी दिल्ली - ड्रायव्हर, क्लीनर आणि पर्सनल ट्रेनर ही कामे बड्या सोसायटीत सामान्य झालीत परंतु आता उच्चभ्रू इमारतीत नव्या नोकरीचे पर्याय उपलब्ध झालेत. ही अशी कामे आहेत ज्याच्या बाबत तुम्ही कधी विचारही केला नसेल. कुणी तुम्हाला सांगितलं, एखाद्या सोसायटीत सकाळ, संध्याकाळ फक्त श्वानाला वॉक करण्यासाठी महिन्याला ७ हजार मिळतील तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु सध्या हा ट्रेंड वेगाने वाढत आहे.
'या' कामांसाठी हवेत लोक
उच्चभ्रू सोसायटीत कुत्र्यांना फिरवण्यासाठी, त्यांची स्वच्छता ठेवण्यासाठी(प्रत्येक कुत्र्यामागे १००० ते १५०० रूपये), कबुतरांना रोखण्यासाठी जाळी बनवणे(३ बाल्कनींना मिळून १२ हजार रूपये), वाहन धुण्यासाठी आणि घराबाहेरील परिसर स्वच्छ करण्यासाठी माणसं नेमली जातात. मधल्या काळात सोसायटीत लहान मुलांना सांभाळणे, घरातील स्वच्छता करण्याची मागणी वाढली होती. त्यानंतर घरापर्यंत सामान पोहचवण्याची मागणी वाढली आता त्यासारखेच अन्य कामांसाठी माणसांची गरज भासत आहे.
बॉल सर्चरचीही मागणी वाढली
आणखी एक असं काम आहे जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. हे काम आहे बॉल सर्च करणे. म्हणजे गोल्फ कोर्स मैदानात बॉल शोधणे. मलेशिया, चीन आणि अमेरिकेसारख्या देशात हे आधीच आहे परंतु आता भारतातही त्याची मागणी वाढली आहे. श्रीमंत लोक गोल्फ कोर्स मैदानात येतात, ते त्यांच्यासोबत बॉल सर्चरही ठेवतात. जो त्यांनी मारलेल्या शॉटनंतर बॉल शोधून आणतो. त्यासाठी त्याला चांगली रक्कमही दिली जाते.
दरम्यान, चीनमध्ये एक नवीन क्षेत्र पुढे आले आहे ज्याला पेई पास म्हणजे ट्रेकिंगचा सहकारी, हे फिट आणि एथलेटिक युवक असतात जे बाहेरच्या पर्यटकांना आणि गिर्यारोहकांना मदत करतात. त्यांना डोंगरावर चढण्यासाठी मार्गदर्शन आणि शारिरीक मदत करतात. एका ट्रेकिंगसाठी ते ५०-७० डॉलर चार्ज करतात.