नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे न्यूयॉर्क शहरातील मेडिसन स्क्वेअरमध्ये स्वागत करण्यासाठी भारतीय-अमेरिकनांनी हिरिरीने निधी गोळा केला आहे. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांवरून भारतीयांनी ज्या गतीने पैसे उभे केले आहेत ते बघून तर या कार्यक्रमाचे आयोजक इंडियन अमेरिकन कम्युनिटी फाऊंडेशन चकित झाले आहेत. बातम्या खऱ्या मानल्या तर फार थोड्या दिवसांत भारतीयांनी १.६ दशलक्ष डॉलर्स गोळा केले आहेत.मोदी २८ सप्टेंबर रोजी अमेरिकन-भारतीयांना मेडिसन स्क्वेअर ग्राऊंडवर मार्गदर्शन करतील व त्यांची भेट घेतील. या कार्यक्रमासाठी आम्ही पैसे देणार नाही, असे भारत सरकारने फाऊंडेशनला आधीच सांगितले होते. प्राथमिक अंदाजानुसार या स्वागत समारंभासाठी आयोजकांना ४ ते ७ लाख डॉलर्स खर्च येणार आहे. आयोजकांपैकी काहींनी कार्यक्रमाच्या जागेसाठी स्वत:चा पैसा खर्च केला व नंतर वेबसाईट तयार करण्यात आली. या वेबसाईटद्वारे कोणीही ५, १० पासून ५ हजार डॉलर्सपर्यंत देणगी देऊ शकतील. निधीपैकी तब्बल ८० टक्के रक्कम ही मध्यमवर्गीय भारतीय -अमेरिकनांनी दिली आहे. (वृत्तसंस्था)
मोदींच्या स्वागतासाठी जमलेला निधी पाहून आयोजक चकित
By admin | Updated: September 25, 2014 10:58 IST