नवी दिल्ली : भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल सूचना व प्रसारण मंत्रालयाने ‘अल जजिरा’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वृत्तवाहिनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली. या वाहिनीवर गेल्या वर्षभरात प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांमध्ये अनेकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्यात आला आहे. त्यात भारताचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर असल्याचे दाखविले असल्याचा आरोप सूचना व प्रसारण मंत्रालयाने आपल्या नोटिशीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबद्दल वाहिनीला स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.‘आपल्या वाहिनीने २०१३ या वर्षात प्रसारित केलेल्या विविध घटनांबाबतच्या वृत्तांमध्ये जम्मू-काश्मीरला भारताच्या सीमेबाहेरचा भूभाग दाखविण्यात आला आहे,’ असे या नोटिशीत म्हटले आहे. मंत्रालयाने याबाबत सर्व्हेअर जनरल आॅफ इंडियाकडेही तक्रार दाखल केली होती. सर्व्हेअर जनरल आॅफ इंडियाच्या कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ‘अल जजिरा’ला ही नोटीस बजावण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल ‘अल जजिरा’ वाहिनीला नोटीस
By admin | Updated: September 1, 2014 12:45 IST