एखाद्याला व्यक्तीला खोदकाम करताना असं काही मिळते, ज्याने तो रातोरात श्रीमंत होतो अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. ही कहाणी नाही तर सत्य आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरच्या वैराकारुर, कुरनूल गावात लोक दूर दूरहून शेतात हिरे शोधायला येतात. बऱ्याचदा त्यांना यश मिळते, लाखोंचे हिरे त्यांच्या हाती लागतात. कधी कधी १-२ लाख तर काहींचं नशीब इतके जोरदार असते की त्यांना ५० लाखांचे हिरेही सापडतात.
मान्सूनला सुरुवात होताच आंध्र प्रदेशच्या वैराकरूर, जोन्नागिरी, मद्दीकेरामध्ये लोक त्यांचे नशीब आजमावण्यासाठी पोहचतात. कारण मान्सूनच्या पहिल्या पावसात जमिनीच्या वरचा थर वाहू लागतो, त्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत हिरे चमकू लागतात. तेलंगणा आणि कर्नाटकातूनही या जिल्ह्यात लोक येतात. प्रत्येक जण स्वत:सोबत काही ना काही हत्यार घेऊन कुणी बाईकवरून, कुणी रिक्षाने तिथे पोहचते. सर्वांनाच एकाच गोष्टीची आस असते ती म्हणजे हिऱ्याची...
मागील वर्षी सापडले ५ कोटींचे हिरे
एका रिपोर्टनुसार, दरवर्षी पावसाळ्यात फक्त मद्दीकेरा आणि तुग्गली येथे ५ कोटी रुपयांचे हिरे सापडतात. हे हिरे मुंबई किंवा सुरतला नेले जातात आणि चांगल्या किमतीत विकले जातात. संपूर्ण हंगामात येथील लोक त्यांच्या कुटुंबासह एकाच ठिकाणी राहतात. काही मंदिरांमध्ये थांबतात, तर काही झाडांखाली तंबू ठोकून सतत हिऱ्यांचा शोध घेतात. काहींसाठी या शोधामुळे त्यांचे नशीब बदलते. हिरे खरेदीदार पावसाळ्यात वाट पाहत असतात. या परिसरात हिरे मिळण्याबाबत १-२ नव्हे तर अनेक बातम्या पुढे आल्या आहेत. मागील महिन्यात मद्दीकेरा आणि तुग्गली येथे ४ हिरे सापडले त्यांची किंमत ७० लाखांच्या आसपास होती. जून महिन्यात एका महिलेला हिरा मिळाला होता, त्याची किंमत १० लाख इतकी होती.
दरम्यान, अनेक संस्थांनी आंध्र प्रदेशातील या भागांना हिऱ्यांसाठी हॉटस्पॉट घोषित केले आहे. अशा परिस्थितीत येथील लोकांनाही याचा फायदा झाला आहे. येथे हिरे शोधण्यासाठी खोदकाम करावे लागत नाही. कारण पाऊस पडल्यानंतर जमिनीचा पहिला थर निघून जातो. आणि लोकांना मातीवर लहान दगडांसारखे हिरे सापडतात. म्हणून बहुतेक लोक हिरे शोधण्यासाठी आणि हिरे बाहेर काढण्यासाठी पीठ चाळणी आणि चमचा वापरतात. इथं हिरे शोधण्याची परंपरा नवीन नाही. ब्रिटिश काळापासून येथे हिरे सापडत आहेत. दरवर्षी अनेक लोक हिऱ्यांच्या शोधात येतात. काहींना हिरे सापडतात तर काहींना सापडत नाहीत.