सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात कोणाला उभे करायचे असेल त्याला करा. विक्रमी मताधिक्याने माझा विजय झाला नाही, तर मी कायमचे राजकारण सोडून देईन आणि विजयी झालो, तर संजय पाटलांनी अपघाताने व लाटेवर मिळालेली खासदारकी सोडावी, असे आव्हान सोमवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले. सांगलीच्या पोलीस मुख्यालय परिसरातील सभागृहात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा झाला. यावेळी आर. आर. पाटील यांनी खा. संजय पाटील यांच्यासह भाजपामध्ये गेलेल्या व वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे काही नेते वाऱ्याबरोबर पाठ फिरवत आहेत. काहींनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, काहीजण गेल्यात जमा आहेत, तर काहींनी नुसत्याच गाठीभेटी केल्या आहेत. या सर्वांना माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर निघून जावे. अशा कोणत्याही नेत्याबरोबर चर्चा करण्याची आमची तयारी नाही. ज्यांचा निष्ठेशी, विचारांशी संबंध नाही, असे लोक पक्षातून गेल्याने काहीच फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी जतमधील प्रकाश शेंडगेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना आमदारकी मिळाली, पण धनगर समाजाला काय मिळाले, याचा विचार समाजाने करावा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पराभूत झालो तर राजकारण सोडेन
By admin | Updated: August 12, 2014 02:23 IST