ऑनलाइन टीमजम्मू, दि. ६ - जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीमध्ये गस्त घालणा-या भारतीय सैन्याच्या बोटीला अपघात झाल्याने बीएसएफचा एक जवान वाहत पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचला आहे. पाकिस्तान सैन्याने या जवानाला ताब्यात घेतले असून भारतीय अधिका-यांनी चर्चा केल्यावर पाकने त्या जवानाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मूतील अखनूर जिल्ह्यातील चिनाब नदीमध्ये बीएसएफच्या ३३ व्या बटालियनचे पाच जवान एका बोटीतून गस्त घालत होते. मात्र अचानक बोटीत तांत्रिक बिघाड झाला व बोट उलटली. पाचपैकी चार जवान सुखरुप किना-यावर पोहोचले. मात्र एक जवान पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. पाकिस्तानमधील सियालकोट येथे पाक रेंजर्सनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या दरम्यान, भारतीय अधिका-यांनी पाक सैन्याच्या अधिका-यांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. सत्यशील यादव असे या जवानाचे नाव असून ध्वजबैठकी दरम्यान या जवानाला भारतीय अधिका-यांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे सत्यशील यादवचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नदीतून वाहत भरतीय जवान पाकमध्ये
By admin | Updated: August 6, 2014 18:49 IST