नवी दिल्ली : कोल्हापूरच्या दोन क्रूर बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली असून देशाच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला फासावर चढणार आहे. १३ कोवळ्या मुलांचे अपहरण करून त्यापैकी नऊ जणांची हत्या करणाऱ्या रेणुका किरण शिंदे आणि सीमा मोहन गावित या निर्दयी बहिणींना २००१ मध्येच फाशी ठोठावण्यात आली होती.राष्ट्रपतींनी गेल्याच महिन्यात त्यांच्या दयायाचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून सर्व संबंधितांना कळविण्याची औपचारिकता पूर्ण पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला दिलेली मुदत शनिवारी संपत आहे.रेणुका, सीमा या दोन बहिणींसह त्यांची आई क्रूरकर्मा अंजनाबाई ही लहान मुलांना पळवून त्यांना भीक मागायला लावायची. ही मुले कमाईचे साधन असेपर्यंतच त्या त्यांना सोबत ठेवत. पळून आलेल्या १३ पैकी ९ मुलांची त्यांनी क्रूरपणे हत्या करीत विल्हेवाट लावली. अंजनाबाई हिचे खटल्याच्या काळात निधन झाले असून रेणुका आणि सीमा सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत. या मुलींचा बाप किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार बनला असून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या दोघींना फासावर चढविण्याबाबत ‘ना हरकत’ अद्याप मिळायची आहे. राष्ट्रपतींनी दयायाचिका फेटाळली असल्याचे आम्ही दोन्ही आरोपी महिलांना, त्यांच्या नातेवाइकांना, सर्वोच्च न्यायालयातील लिगल रिमेडियल सेल तसेच जिल्हा न्यायालयाला कळविले असल्याचे गृहविभागाचे डेस्क आॅफिसर दीपक जाडिये यांनी सांगितले. २००१ मध्ये कोल्हापूरचे न्यायाधीश जी.एल. येडके यांनी दोन बहिणींनी नऊ मुलांची केलेली हत्या ही निर्घृण असल्याचा उल्लेख केला होता. या दोन बहिणींना मुलांना जीवे मारताना अघोरी आनंद मिळत असावा असा शेराही त्यांनी मारला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशात प्रथमच महिला फासावर चढणार
By admin | Updated: August 15, 2014 00:11 IST