भिवंडी : गोदामात काम करणारे चार कामगार ओवळी गावातून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना चोर असल्याच्या संशयाने बदडले. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या त्यांच्या सात साथीदारांनादेखील गावातील तरुणांनी बांबू, लाठ्या-काठ्यांनी बदडले. या प्रकरणी २४ ग्रामस्थांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.थंडीच्या दिवसांत ग्रामीण भागात चोर शिरतात, अशा अफवा तालुक्यात पसरल्या आहेत. यासंदर्भात कोणतीही खात्री करून न घेता ओवळी गावात ११ कामगारांना मारल्याची घटना घडली. तालुक्यातील गोदामात काम करून समूहाने वळपाड्यात भाड्याने राहणारे श्रीकांत आहीर, माणिक बागुल, सोरम मंडल, रूपल आहीर हे चौघे पश्चिम बंगालचे कामगार घरी परतत होते. सुटी असल्याने शुक्रवारी सायंकाळी ओवळी गावातून फिरत गेले. त्या वेळी गावातील तरुणांनी त्यांना हटकले असता भाषा न समजल्याने घाबरून ते आपल्या घराच्या दिशेने पळू लागले. त्यामुळे गावकऱ्यांना ते चोर असल्याचा संशय आला. त्यांनी त्यांना मारहाण केली. या चौघांबरोबर वळपाड्यात राहणाऱ्या सात जणांना खोलीबाहेर काढून ठोशा-बुक्क्यांनी व लाठीकाठीने मारहाण केली. हे सर्व कामगार ‘ग्लोबल कम्पाउंड’मधील ‘सहानुभूती एंटरप्रायझेस’मध्ये काम करीत आहेत. पोलिसांनी ओवळी गावातील २४ जणांविरोधात गुन्हा दाखल करीत नऊ जणांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
चोर समजून कामगारांना बदडले
By admin | Updated: December 29, 2014 05:16 IST