चीनमधील एका महिलेने आतापर्यंत २० जणांना डेट केले, त्यांच्याकडून गिफ्ट म्हणून आयफोन मागितले. त्यानंतर हे सर्व आयफोन विकून तिने मिळालेल्या रक्कमेतून एक घर खरेदी केल्याचं समोर आले आहे. एका व्हायरल स्कॅमच्या खुलाशानंतर हा प्रकार चर्चेत आला. चिनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे सर्च केले जात आहे.
साऊथ चायना पोस्टनुसार, चीनमध्ये अलीकडेच एक घोटाळा समोर आला आहे. ज्याचं नाव क्रॉस ड्रेसिंग स्कॅम आहे. यात एक व्यक्ती महिला बनून युवकांना डेट करतो आणि त्यांच्याकडून पैसे लंपास करतो. सिस्टर हांग नावाचा व्यक्ती चीनमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. सिस्टर हांगच्या या करारनाम्याने चीनच्या लोकांना मागे घडलेल्या एका प्रकरणाची आठवण होत आहे. ९ वर्षापूर्वी सिस्टर हांगसारखी एक महिला काही लोकांना डेट करून त्यांच्याकडून महागडे आयफोन घेतले आणि ते फोन विकून तिने घर खरेदी केले.
ही कहाणी लोकांना रंजक वाटत होती कारण अवघ्या ६ महिन्यात या महिलेने २० जणांना डेट केले होते. तिने त्यांच्याकडून आयफोन घेतला होता. या महिलेने सर्व आयफोन विकून १७ हजार डॉलर म्हणजे १५ लाख रुपये जमा केले. त्यातून तिने फ्लॅटची आगाऊ रक्कम भरली होती. २०१६ च्या रिपोर्टनुसार, या महिलेची ओळख समोर आली नाही परंतु ती शेन्जेंगच्या एका कंपनीत ज्यूनिअर क्लार्क म्हणून काम करत होती. तिला मिळणाऱ्या पगारात तिने घर कसे खरेदी केले यावरून तिच्यावर संशय दाटला. काहींनी तिची चौकशी केली असता तिने सहा महिन्यात २० जणांना डेट केल्याचे समोर आले.
या महिलेने तिला डेट करणाऱ्या प्रत्येकाकडे आयफोन ७ मागितला होता. तिला २० आयफोन मिळाले, त्यानंतर तिने हे सर्व फोन विकून १७ हजार अमेरिकन डॉलर जमवले. त्याचा वापर तिने एक फ्लॅट खरेदी करण्यासाठी पहिला हफ्ता म्हणून भरली. ही महिला इंटरनेटवर तिचे मोबाईल विकत होती. ऑनलाईन ट्रेंडिंग कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने महिलेबाबत खुलासा केला. आम्हाला महिलेची ऑर्डर मिळाली होती, तिच्याकडे २० आयफोन ७ होते. बहुतांशचे फोनचे पॅकेजिंग उघडले नव्हते. प्रत्येक मोबाईल ६ हजार युआनहून अधिक किंमतीला विकला. त्यातून तिला १, २०,००० युआन मिळाले.