सध्याच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण बरेच वाढले आहेत. त्यातील एक गुगलमध्ये काम करणाऱ्या महिलेने घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात घडलेला बदल सोशल मीडियात शेअर केला आहे. घटस्फोटानंतर पती किंवा पत्नी यांना पुढचा काही काळ आव्हानात्मक जातो. जीवनाच्या या कठीण प्रसंगात त्यांच्या आयुष्यात सर्व काही गमावल्याचं त्यांना जाणवू लागते. परंतु गुगलमधील एका महिला कर्मचाऱ्याने जो अनुभव शेअर केला आहे त्यातून जगण्याची नवी आशा मिळेल. यशस्वीरित्या आयुष्याशी लढाई लढत राहणे हा एकमेव पर्याय असल्याचं दिसून येते.
कॅलिफोर्नियात राहणाऱ्या ३७ वर्षीय वीनस वांगने घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या आव्हानांचा आणि त्यानंतर मिळालेल्या यशाबाबत एका मुलाखतीत खुलासा केला. वीनसने सांगितले की, घटस्फोटानंतर बचतीच्या नावाखाली माझ्याकडे १० हजार डॉलरहून कमी रक्कम शिल्लक होती. ज्यात अमेरिकेसारख्या देशात जगणं खूप अडचणींचे आहे. त्या कठीण काळात माझ्या मुलीचा सांभाळ करतानाच १ वर्ष माझ्याकडे कुठलाही जॉब नव्हता परंतु डिवोर्स हा एक वेक अप कॉल होता. यामुळे माझ्या वैयक्तिक जीवनात बरेच बदल घडले. कुणाची तरी पत्नी झाल्यानंतर आता सिंगल मॉम म्हणून आयुष्य काढणे मोठे आव्हान होते असं तिने सांगितले.
मुलीच्या संगोपनासाठी स्वत:ला आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे हे ध्येय वीनससमोर होते. घटस्फोटानंतर १ वर्ष घरी काढल्यानंतर वीनस यांनी पुन्हा काम शोधायला सुरूवात केली. टेक वर्ल्डमध्ये काम शोधत एआयच्या जगात पाऊल ठेवले. अथक प्रयत्न, सातत्याने मेहनत या जोरावर वीनस यांना सध्या १ मिलियन अमेरिकन डॉलर इतका पगार आहे. त्या सध्या एका बड्या टेक फर्मीच्या कंपनीत एआय विभागात काम करतात.
दरम्यान, वीनस वांगने २०२४ साली एआय कंपनीत ३ वेगवेगळ्या भूमिका निभावल्या. गुगल सोडून त्यांनी एक स्टार्टअप ज्वाईन केले तर दुसरीकडे एका मोठ्या टेक कंपनीत त्यांनी काम सुरू केले. नोकरी बदलल्याने त्यांना ३ वर्षात पगार ३ लाख डॉलरवरून ९ लाख ७० हजार डॉलर याप्रमाणे ३ पटीने वाढला. वीनस यांच्या एकूण पगाराच्या पॅकेजमध्ये इक्विटी आणि बोनस यांचाही समावेश आहे. नोकरी बदलल्यामुळे मिळालेल्या ग्रोथनं आज वीनस यांचा पगार १ मिलियन अमेरिकन डॉलर इतका वाढला आहे.