जळगाव : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे कामे प्रलंबित राहणे, कामाला गती न मिळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून आता फायली निकाली निघण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. सीईओंनी तशी तयारी सुरू केली आहे.
अनेक दालने रिकामी
जि.प.त अनेक प्रमुख पदे रिक्त आहेत. त्यात बांधकाम व लघुसिंचन विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नाही. शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकार्याचे एक पद रिक्त आहे. कृषि विकास अधिकार्यांचे पद केव्हा भरले जाईल याकडेही लक्ष आहे. काही अधिकारी नवृत्तीच्या टप्प्यावर असल्याने काम करणे टाळत आहे. कुठल्या फायलीवर काय निर्णय घ्यायचा हेदेखील ते इतरांना विचारून ठरवत आहेत. तसेच इतर किरकोळ पदेही रिक्त आहेत. त्यात बांधकाम विभागामध्ये तर अनेक पदे रिक्त आहेत. या विभागामध्ये २६ कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता ही पदे रिक्त आहेत. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची ४0 पदे रिक्त आहेत. बांधकाम विभागामध्ये अभियंता यांची सरळसेवेची आठ पदे रिक्त आहेत तर पदोन्नतीअभावी १६ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीच्या अनेक फायली लटकल्या आहेत. पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागातही अनेक प्रमुखपदे रिक्त आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये व्यवस्थित सेवा मिळत नाही. सीईओ, अतिरिक्त सीईओ, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि या विभागाचे प्रमुख हे या रिक्त पदांची स्थिती व प्रलंबित असलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियेला जबाबदार आहेत.
प्रभारी अधिकारी सक्षमपणे व गतिमानतेने कामे करीत नाही. वित्त विभागात पूर्णवेळ प्रमुख असताना अनेक फायली अडकवून ठेवल्या जातात, अशा तक्रारी मागील दोन सभांमध्ये करण्यात आल्या. तक्रारी कायम आहेत याचा अर्थ कामकाजात सुधारणा झालेली नाही.
--------
कुठल्याही विभागामधील फाईल आठ दिवसात निकाली निघायला हवी, परंतु फायली महिनाभर किंवा त्यापेक्षा अधिक काळदेखील अडकलेल्या असतात. वित्त, बांधकाम, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांबाबत अनेक तक्रारी असतात. ही बाब लक्षात घेता प्रमुख अधिकारी नसले तरी फाईल गतीने निकाली निघावी यासाठी जि.प.ची स्वतंत्र ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. सर्व विभागांमध्ये येणार्या फायलींचा तपशील त्यात असेल. फायलीचा प्रवास कुठपर्यंत झाला याची अद्ययावत माहिती रोज या यंत्रणेत दिसेल. सीईओ डी.एम.मुगळीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.