सरीसृपांसह पक्ष्यांचेही जीव गेल्याची शक्यता : आगीचे कारण अस्पष्ट ; मोहाडीच्या १५० हून अधिक नागरिकांनी आटोक्यात आणली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - तालुक्यातील मोहाडी शिवारातील रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेच्या मागे वनविभागाच्या कुरण नंबर २६ च्या क्षेत्रावर बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे सुमारे २० हेक्टर क्षेत्रावरील कुरण जळून खाक झाले आहे. तर या आगीमध्ये असंख्य सरीसृपांसह अनेक पक्ष्यांचाही भाजल्याने मृत्यू झाल्याची शक्यता काही वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिरसोली, मोहाडी या भागातील वनक्षेत्रात रात्री-बेरात्री अनेक युवकांच्या पार्ट्या होतात. याठिकाणी वाढत जाणारा मानवी वावर यामुळे या ठिकाणी ही आग लागली असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वनक्षेत्रांना उन्हाळ्यात आगी लागण्याचा अनेक घटना घडतात. मात्र, हिवाळ्यात मोहाडी शिवारातील वनक्षेत्रावर बुधवारी रात्री अचानक आग लागली. यामध्ये २० हेक्टरवरील कुरण जळून खाक झाले आहे. तर अनेक सरीसृपांचा मृत्यू यामध्ये झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
आगीचे वेगवेगळे कारण
१. या भागात रात्रीच्या वेळेस अनेक मद्यपी युवक पार्टीला येतात. यावेळी जळालेली सिगारेट फेकून देतात. या सिगारेटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.
२. हिवाळ्याचे दिवस असल्याने पार्टीला येणाऱ्यांनी रात्री शेकोटी पेटवली असेल, मात्र जाताना ती न विझविल्याने हवेमुळे या भागात आग लागली असल्याची दुसरी शक्यताही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
३. या भागात ससे, हरीण असे वन्यजीव आढळतात. यामध्ये ससा या प्राण्याची शिकार केली जाते. अनेकदा शिकारी परिसरात ट्रॅप लावून एका बाजूला आग लावतात. त्यामुळे वन्यप्राणी दुसऱ्या बाजूला म्हणजेच ट्रॅप लावलेल्या भागाकडे पळत जातात. या शिकारीसाठी देखील ही आग लावण्यात आल्याची शक्यता काही वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे.
अन्यथा शेकडो हेक्टर क्षेत्र जळून झाले असते खाक
रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास आग लागली असल्याची शक्यता आहे. ९.३० पर्यंत आगीच्या ज्वाळा दिसल्याने काही जणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर काही जणांनी घटनेची माहिती वनविभागासह मोहाडी ग्रामस्थांना दिली. घटनेची माहिती मिळताच मोहाडी येथील सुमारे १५० हून अधिक नागरिक व युवक धावत आले. माती, झाडाच्या फांद्याच्या सहाय्याने नागरिकांनी अवघ्या दोन तासांच्या आत ही आग आटोक्यात आणली. रात्री ११.३० पर्यंत आग बऱ्यापैकी विझविण्यात आल्याची माहिती मोहाडी ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, जैन कंपनीच्या दोन अग्निशमन विभागाच्या बंबदेखील झाले. मात्र, त्याआधीच बरीच आग आटोक्यात आली होती.
सरीसृप व पक्ष्यांचा मृत्यू
या आगीमुळे सुमारे २० हेक्टर क्षेत्रावरील कुरण पूर्णपणे जळाले आहे. या भागातील मोठ्या वृक्षांचे या आगीमुळे नुकसान झाले नाही. मात्र, जमिनीवर सरपटणारे साप, सरडा, घोरपड अशा प्राण्यांसह ससे व काही पक्ष्यांचा देखील या आगीत भाजून मृत्यू झाल्याची माहिती वन्यजीवप्रेमींनी दिली. तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आगीमुळे केवळ कुरण जळून खाक झाले असून, यामध्ये कोणत्याही प्राण्याचा किंवा पक्ष्यांचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक होशींगे यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्यासह वनक्षेत्रपाल आर.जे. राणे, वन अभ्यासक विवेक देसाई यांनीही झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.