फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावातील अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात संतोष रमेश पाटील (वय ३४, रा. गोंडगाव, ता. भडगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी शिरसोली गावानजीक घडली. दरम्यान, अपघातानंतर पसार होणाऱ्या मालवाहू वाहनाला ग्रामस्थांनी पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शहरातील खेडी परिसरातील पंढरपूरनगरातील मंजुळाबाई मन्साराम पाटील (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी गोंडगाव येथील नातेवाईक शनिवारी चारचाकीने जळगावात आले होते. तर संतोष रमेश पाटील हा दुचाकीवरून आला होता. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यावर नातेवाईक पुन्हा चारचाकीने परत गावाकडे निघाले. यावेळी संतोष याने मी सारी सरकावयाचा कार्यक्रम आटोपून येतो असे सांगितले. नातेवाईक मार्गस्थ झाल्यानंतर थोड्या वेळाने संतोष हा त्यांच्या दुचाकीने (एम.एच. १९ बी.ए. ५४२३) गोंडगावला जाण्यासाठी निघाला असता शिरसोलीजवळील आकाशवाणी केंद्रासमोर समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (एम.एच. ०४ ई.वाय. ४१७२) संतोषच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात संतोष रस्त्यावर फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळ गाठले. फरार होत असलेल्या मालवाहू चालकास वाहनासह पकडले. तसेच एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, शुद्धोधन ढवळे यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.
मयत संतोष पाटील खाजगी वाहनावर चालक होता. त्याच्या पश्चात वडील रमेश वामन पाटील, आई सरस्वताबाई, पत्नी रत्ना व दोन मुले युवराज व प्रशांत असा परिवार आहे.