जळगाव : क्रेडिट कार्डचा क्रमांक विचारून पवनकुमार महावीरसिंह शाक्य (वय २९, रा. भारत नगर, जळगाव मूळ रा. उत्तर प्रदेश) याला ऑनलाईन १ लाख ३१ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनकुमार हा तरुण एमआयडीसीतील हितेश प्लास्टिक या कंपनीत कामाला आहे. मार्च महिन्यात पवनकुमार याच्याकडे स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड कंपनीचे नाव सांगून एक व्यक्ती आला. आपल्याला बँकेचे क्रेडिट कार्ड पाहिजे आहे का? अशी विचारणा केली असता पवनकुमार याने त्यास होकार दिला. त्यानंतर संबंधित व्यक्ती आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन गेला व ३० जून रोजी पोस्टाने क्रेडिट कार्ड कंपनीत आले. या काळात पवनकुमार हा उत्तर प्रदेशात गेलेला होता. तेथून परत आल्यावर कंपनीच्या वॉचमनने हे कार्ड दिले. त्यानंतर २४ जुलै रोजी क्रेडिट कार्डचे २७३६ रुपये बिल झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे इंटरनेटवर बँकेचा कस्टमर केअर क्रमांक शोधत असताना एक क्रमांक मिळाला, त्यावर संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीने विश्वासात घेत क्रेडिट कार्ड व बिलाविषयी माहिती विचारली व त्यावर पवनकुमार याने त्याला दिली.
काही सेकंदात ५ वेळा कपात झाली रक्कम
दरम्यान, या व्यक्तीने याबाबत अडचणी असल्याचे सांगून समोरील व्यक्तीने तुम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलावे लागेल असे सांगून एक मोबाईल क्रमांक दिला, त्यानुसार त्यावर संपर्क साधला असता त्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचा क्रमांक मागितला. हा क्रमांक दिल्यावर २५ हजार २५० रुपये कपात झाले, त्यानंतर लगेच ३० हजार रुपये कपात झाले. आणखी थोड्यावेळाने २५ हजार २५० रुपये तीन वेळा कपात होऊन एकूण १ लाख ३१ हजार रुपये बँकेतून कपात झाल्याचे संदेश आले. हा प्रकार पवनकुमार याने सोबत काम करणाऱ्या मित्रांना सांगितला. त्यानंतर बँकेत जाऊन चौकशी केली असता क्रेडिट कार्डचा व्यवहार थर्ड पार्टी असतो असे सांगितले. त्यामुळे पवन याने रिझर्व्ह बँकेकडे ऑनलाईन तक्रार केली. त्याचाही उपयोग न झाल्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक विशाल सोनवणे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.