लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विविध योजनांवरील खर्च, नियमानुसार सभा अशा विविध निकषात उत्कृष्ट काम केल्याने नाशिक विभागातून यशवंत पंचायत राज अभियानात २०१९-२० मध्ये जळगाव जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानंतर आता राज्यस्तरीय निवडीसाठी मूल्यांकन करायला कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एक समिती सोमवारी जिल्हा परिषदेत कागदपत्रांची तपासणी करणार आहे.
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने २०२० मध्ये विविध निकषांची तपासणी केली होती. यात जिल्हा परिषदेने केलेल्या योजनांवरील खर्च, सर्व सभा नियमानुसार नियमित झाल्या आहेत का? आस्थापनाविषयक कामे व्यवस्थित आहेत का? असा एकत्रित प्रशासकीय आढावा यात घेण्यात आला होता. त्यानंतर विभागानेच आता थेट राज्यस्तरीय पुरस्कारासाठी तपासणीला जि.प.त समिती येणार असल्याचे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांना प्राप्त झाले असून ही समिती सोमवारी तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी तपासणी
सोमवारी आवश्यक सर्व कागदत्रांची साने गुरुजी सभागृहात तपासणी तसेच क्षेत्रीय पडताळणी करण्यात येणार आहे. ठाणे जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार हे दोन अधिकारी ही पडताळणी करणार आहेत. या समितीला १ मार्च पर्यंतचा हा अहवाल सादर करायचा आहे. यात जि.प. जळगाव व राहता पंचायत समिती, जि. अहमनगर यांची तपासणी होणार आहे.
सहा विभागातून संधी
सहा विभागातून सहा जिल्हा परिषद व सहा पंचायत समित्यांची प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. यातून आता राज्यस्तरावर एक जि. प. आणि एक पं.स. ची निवड केली जाणार आहे. यात ३०० गुणांपैकी निकषानुसार गुण दिले जाणार असून यातून राज्यस्तरावर निवड केली जाणार आहे.