लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फर्दापूर ते जळगाव महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहेत़ या महामार्गावर पाच ते सहा पूल बांधण्यात येत असून त्यांचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे आहे. भविष्यात मोठी दुर्घटनाही घडू शकते. महत्वाचे म्हणजे, पाया बांधत असताना स्टीलचा खूप कमी प्रमाणात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे यात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती गुरूवारी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपकुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या पुलांची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
फर्दापूर ते जळगाव या पंधरा ते वीस कि.मी.च्या अंतरात पाच ते सहा पूल बांधण्यात येत आहे. त्यात विमानतळाच्या काही अंतरापूढे पूल बांधला असून संरक्षक भिंतीमध्ये कमी प्रमाणात स्टील टाकले गेले आहे. फक्त बॉटम मॅटमध्ये काँक्रीटीकरण करण्यात आले. चिंचोलीजवळील पूलात सिंगल बॉटम मॅट टाकली आहे. त्यातही कमी स्टील वापरले आहे़ कंडारी व कुसुंबाजवळील पुलांचीही तीच स्थिती आहे. कमी स्टील व डबल ऐवजी सिंगल मॅट वापरल्यामुळे निकृष्ट दर्जाचे पूल तयार होत आहे, असा आरोप गुप्ता यांनी केला आहे. दरम्यान, त्या कामांचे देखील फोटो त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. एका पुलाचे काम चिखलात सुरू आहे, पुढे जावून तो पूल कोसळण्याची भिती आहे. त्यामुळे या कामांची पाहणी करून चौकशी करण्यात यावी व गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.