कुरंगी, ता. पाचोरा : कुरंगी (ता. पाचोरा) येथील एक विवाहिता महिला शेतात काम करत असताना अचानक मधमाशांचा हल्ला झाल्याने जबर जखमी झाल्या आहेत. मात्र जवळच असलेल्या प्लॅस्टिक घोंगडी अंगावर घेतल्याने या महिलेचे प्राण वाचले.
दि. २५ जुलै रोजी कुरंगी येथील स्वाती वासुदेव पाटील (३०) ही विवाहिता आपल्या घरच्या कुरंगी शिवारात असलेल्या शेतात कापूस पिकाला गावातील तीन महिलेसोबत घेऊन रासायनिक खते देत होते. दुपारी खत देऊन झाल्यावर शेतात असलेल्या आंब्याच्या झाडावर मोठे आगे मोहोळ बसलेले होते. झाडाखालून घराकडे जात असताना स्वाती पाटील यांच्यावर अचानक माशांनी हल्ला चढवला.
त्यांच्याजवळ असलेल्या पाऊस पाणीच्या बचाव करण्यासाठी असलेल्या प्लॅस्टिक घोंगडी अंगावर घेतल्याने मोठा अनर्थ टळला. तोपर्यंत दहा ते पंधरा माशांनी महिलेच्या चेहऱ्यावर, मानेवर चावा घेतला. त्यांना प्राथमिक उपचारासाठी नांद्रा आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या हल्ल्यामध्ये ही महिला जबर जखमी झाली असून संपूर्ण चेहऱ्यावर सूज आली आहे.