जळगाव : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराच्या औषधींवरील जीएसटीमध्ये कपात करून तो पाच टक्क्यांवर आणला तरी औषधींच्या किंंमतीमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे औषधी विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र सरकारच्या घोषनेमुळे सामान्यांच्या आशा पल्लवित होऊन औषधी किती स्वस्त होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. औषधींच्या किंमती कमी करायच्या असतील तर औषधींवरील जीएसटी पूर्णपणे हटविण्यात यावा, असे औषधी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासून आरोग्यावरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. ज्यांना कोरोना झाला त्यांना महागड्या औषधींचा खर्च सहन करावा लागला. मात्र कोरोना झाला नाही व किरकोळ आजारही झाले तरी आता सर्वांच्या मनात धास्ती निर्माण होत आहे. त्यामुळे साहजिकच काही जरी झाले तरी लगेच डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला आहे. यात औषधींवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औषधींच्या किंमतीदेखील प्रचंड वाढल्या असून केवळ साध्या तपासासाठीदेखील दवाखान्यात गेले तरी २०० ते ३०० रुपयांचा खर्च नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे औषधींच्या किमतीचा विषय आला म्हणजे सर्वांच्या नजरा त्याकडे लागतात.
त्यात आता शुक्रवारी जीएसटी कौन्सिलची बैठक होऊन त्यात औषधीसह मालवाहतुकीचा विषय आला. त्यामुळे साहजिकच सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली व नवीन घोषणेमुळे काही स्वस्ताई येते का? याकडे लक्ष लागले. या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटकांची माहिती घेतली असता सामान्यांना याचा फारसा दिलासा मिळणे कठीणच आहे.
काय होऊ शकतो परिणाम?
औषधींवर सध्या १२ टक्के जीएसटी आकारला जातो. त्यात कर्करोग व इतर दुर्धर आजारावरील औषधींवरील जीएसटीचे प्रमाण पाच टक्क्यांवर आणल्याची घोषणा शुक्रवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत करण्यात आली. जीएसटी कमी केले असले तरी त्यामुळे औषधी फारसी स्वस्त होणार नाही. मुळात या या औषधी एवढ्या महाग आहे की, त्यावरील जीएसटी पूर्णपणे हटविला तरच रुग्णांना दिलासा मिळू शकतो. या शिवाय पेशी व स्नायूंवरील महागड्या औषधींवरील जीएसटी रद्द केला आहे. मात्र यासोबतच कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब या आजारांसाठी जास्त प्रमाणात औषधींची मागणी असते, त्यावरील जीएसटी हटविल्यास त्याचा लाभ रुग्णांना अधिक होईल, असे औषध विक्रेते तसेच सामान्यांचेही म्हणणे आहे.