याठिकाणी तत्परता का नाही ? : तीन वर्षांपासून प्रलंबित आहे विषय ; सकारण आदेश होऊनही कारवाई नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी बालाजी पेठ भागातील दोन मजली इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत ही इमारत जमिनदोस्त केली. अनधिकृत बांधकाम असल्याने ते पाडलेच पाहिजे, मात्र जेवढी तत्परता हे अतिक्रमण पाडण्यासाठी मनपा प्रशासनाने दाखविली. ती तत्परता अनेक वर्षांपासून रखडलेल्या बेसमेंट पार्किंग व भंगार बाजाराची जागा ताब्यात घेण्याबाबत का दाखविली जात नाही. विशेष म्हणजे भंगार बाजाराबाबत मनपात ठराव झाला आहे. बेसमेंटबाबत सकारण आदेश झाले असतानाही मनपा प्रशासनाची याठिकाणी कारवाई करण्यास हिंमत का होत नाही ? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाबाबत मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सद्य स्थितीत चांगले काम होत आहे. उपायुक्त संतोष वाहुळे ज्या आक्रमक पद्धतीने कारवाई करण्यास पुढे येत आहेत. ती प्रशंसनीयच आहे. मात्र, जी आक्रमकता रस्त्यावरील हॉकर्स, दुमजलीचे बांधकाम तोडण्यासाठी दाखविण्यात आली ती आक्रमकता बेसमेंट पार्किंग व भंगार बाजार ताब्यात घेण्याबाबत का दाखविली जात नाही. तसेच मनपा आयुक्तांनी ज्या तत्परतेने अतिक्रमण विभागाला दोन मजलीचे बांधकाम तोडण्यासाठी आदेश दिले ते आदेश बेसमेंट व भंगार बाजारबाबत का दिले जात नाही असा प्रश्न उपस्थित करून, मनपा प्रशासनाच्या दुटप्पीपणावर आता नागरिकांकडूनच संताप व्यक्त केला जात आहे.
६५ डॉक्टरांकडून बेसमेंटचा सुरू आहे व्यावसायिक वापर
मनपाकडून बेसमेंट पार्किंगसाठी परवानगी घेऊन त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याच्या अनेक तक्रारी मनपाच्या नगररचना विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नगररचना विभागाकडून शहरातील १०० हून अधिक हॉस्पिटलचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाअंती शहरातील ६५ हॉस्पिटलमधील काही हॉस्पिटलमधील बेसमेंटमध्ये मेडिकल टाकण्यात आले आहे. तर काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठीचे रुम काढण्यात आलेले आढळून आले आहेत. याबाबत मनपाने नोटीस बजावून सुनावणी देखील घेतली होती. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई या तीन वर्षात करण्यात आलेली नाही.
मनपाकडून सुरु आहे नोटिसांचा गोरखधंदा
बेसमेंटचा वापर पार्किंगसाठी न करता त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याची माहिती मनपा प्रशासनाला देखील होती. मध्यंतरी शहरातील ४११ जणांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यात १४१ जण बेसमेंटचा व्यावसायिक वापर करत असल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणी मनपाने अनेकवेळा नोटिसा देखील दिल्या. तसेच यावर कारवाई करण्याचा सूचना देखील तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक अनंत धामणे यांनी दिल्या होत्या. मात्र, या प्रकरणात मनपाकडून केवळ नोटिसांच्या नावावर आपला गोरखधंदा सुरु केल्याचे दिसून येत आहे.
भंगार बाजाराचा ठराव, कारवाई मात्र नाही
शहरातील अजिंठा चौक परिसरातील भंगार बाजाराची मुदत संपून अनेक वर्ष झाले आहेत. हा बाजार ताब्यात घेण्याबाबतचा ठराव काही महिन्यांपूर्वी महासभेत करण्यात आला होता. मात्र, हा ठराव केल्यानंतर देखील याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भंगार बाजार, ट्रान्सपोर्ट नगर, मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे प्रकरण असो वा बेसमेंट प्रकरण या मोठ्या प्रकरणात मनपा प्रशासनाची भूमिका संदिग्ध असल्याचेच आढळून आले आहे.