कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटात गेल्या दीड वर्षापासून पूर्ण देश हैराण झाला आहे. या महामारीने सण व धार्मिक उत्सवांनाही आपल्या महापाशात अडकवून ठेवले आहे. आजही भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांची दारे बंदच आहेत. शाळा व महाविद्यालयेही पूर्णपणे सुरू नाहीत. अजूनही कोरोनाचे नाव काढले म्हणजे अंगावर शहारे येतात. कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात आटोक्यात आल्यामुळे निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आली असली तरी धार्मिक कार्यक्रमांना अजूनही पूर्ण मोकळीक नाही. त्यात आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत आहे. त्यामुळे या वर्षीही गणपती बाप्पा निर्बंधातच अडकेल की काय अशी शंका गणेशभक्तांना सतावत आहे. मागील वर्षीही गणेशाचे आगमन कोरोना विळख्यात झाले होते व या वर्षीही कोरोनाचा फास अजून पूर्णपणे सुटलेला नसल्यामुळे या वर्षीही गणेशभक्तांची निराशाच होईल असे वाटते. तर गणपती बाप्पाच आता तरी हे संकट दूर करो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- भास्कर पाटील