लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला असून यात लक्षणे असलेल्य रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणेची तारांबळ होत असल्याचे चित्र आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३६८ बेड एका दिवसात फूल झाले होते. दुसरीकडे चोपड्यात शंभर खाटांखचीर क्षमता असताना या ठिकाणी १४८ रुग्ण दाखल करण्यात आल्याची माहिती आहे, गंभीर बाब म्हणजे रुग्ण या ठिकाणी घरून खाटा घेऊन दाखल होत आहेत. दुसरकीडे जिल्ह्यातील अन्य डिसीएचसी मध्येही निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण दाखल असल्याची माहिती आहे.
जळगाव शहर व चोपडा या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. या दोन ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जळगाव शहराच्या तुलनेत चोपड्र्यात आता अधिक रुग्ण समोर येत आहेत. शुक्रवारी तब्बल ३६२ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दुसरीकडे जळगाव शहरातही नियमित अडीचशेपेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. गंभीर बाब म्हणजे गेल्या आठ दिवसापासून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे एकीकडे कोविड केअर सेंटर मध्ये रुग्ण बरे होऊन घरी जात असतानाच ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर वरील ताण वाढला आहे. इकर वैद्यकीय महाविद्यालय संपूर्ण बेड फूल झालेले आहेत.
लवकरच नवीन व्यवस्था
देवकर महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय ऑक्सिजनचे शंभर बेड असून येत्या दोन दिवसात ते वापरात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिले शहरात इकरा आणि जीएमसी वगळता अन्य डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर नसल्याने ऑक्सिजनची गरज असणार्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र काही दिवसांपासून आहे.
अखेर पाईपलाईनचे काम सुरू
मोहाडी शिवारात शंभर खाटांचे महिला रुग्णालय उभारण्यात येत आहे. याचे ९५ टक्के काम झाले आहेत. या रुग्णालयात आता दोनशे बेडच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. हे रुग्णालय डीसीएचसी म्हणून मध्यंतरी समोर आले होते त्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात 200 ऑक्सिजन बेड निर्माण होतील या दृष्टीने पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम होऊन रुग्णालय त्यादृष्टीने उपयोगात येणार आहे. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.
क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण
चोपडा, धरणगावातील डीसीएसची मध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. तर अन्य डीसीएचसी मध्येही बेडच्या निम्मे किंवा निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत. ही संख्या दिवसभरात कमी जास्त होत असते. अशी माहिती देण्यात आली.
पाळधीतही व्यवस्था
पाळधी आरोग्य केंद्रांच्या इमारतीत ५० बेडचे ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी ही व्यवस्था होणार आहे.
असे आहेत बेड
चोपडा १००
धरणगाव १०
एरंडोल २०
चाळीसगाव ४०
भडगाव २०
पाचोरा २०
पहूर १०
जामनेर ३०
बोदवड २०
भुसावळ ५०
मुक्ताईनगर ५०
रावेर ३०
न्हावी २०
यावल २०
इकरा १००