सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने सर्वत्र अनलॉक केले आहे. विशेष म्हणजे मुंबईत लोकल सुरू करण्यास परवानगी देताना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना मासिक पास दिला जात आहे. मात्र, रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रवाशांना अद्यापही मासिक पासची परवानगी न दिल्यामुळे, या प्रवाशांना सध्याच्या विशेष रेल्वे गाड्यांनी जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईतल्या प्रवाशांना मासिक पासची सुविधा तर आम्हाला का नाही, असा प्रश्न संतप्त प्रवाशांमधून विचारण्यात येत आहे.
शासनाने १५ ऑगस्टपासून सर्वत्र अनलॉक केल्यानंतर रेल्वे प्रशासनानेही स्थगित केलेल्या गाड्या पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना अद्यापही जनरल तिकीट बंद असून, आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, १५ ऑगस्टपासून रेल्वेने मुंबईतल्या प्रवासी व चाकरमान्यांसाठी लोकल सुरू करून, मासिक पास देण्याची सुविधाही सुरू केली आहे. यामुळे तेथील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातल्या प्रवाशांसाठी अद्यापही मासिक पास वा जनरल तिकिटाची सुविधा सुरु केलेली नाही. त्यामुळे येथील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबईतल्या प्रवाशांप्रमाणे भुसावळ विभागातल्या प्रवाशांसाठीही मासिक पासची सुविधा सुरू करण्याची मागणी चाकरमानी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
सेवाग्राम एक्स्प्रेस
काशी एक्स्प्रेस
हावडा एक्स्प्रेस
अमृतसर एक्स्प्रेस
कुशीनगर एक्स्प्रेस