लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवसेना- भाजपच्या झटापटीत एका कोंबडीला आपला जीव गमवावा लागला. एक नव्हे तर तब्बल तीन ते चार वेळा या जीवंत कोंबडीला इकडून तिकडे फेकण्यात आले. त्यामुळे या आंदोलनात या मुक्या प्राण्याचा काय दोष? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आंदोलनात एका कोंबडीचा मृत्यू झाला असून अन्य एका कोंबडीला भाजप कार्यायालयात आसरा देण्यात आला होता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर शिवसेनेच तीव्र आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद जळगावातही उमटले. राणे यांच्याविरोधात घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळात एक जीवंत कोबंडी भाजप कार्यालयात फेकली. यात ही कोंबडी अर्धमेली झाली होती. मात्र, भाजपकडून पुन्हा ही कोंबडी बाहेर फेकण्यात आली. त्यावेळीही कोंबडीत थोडे प्राण शिल्लक होते. मात्र, पुन्हा महिला पदाधिकाऱ्यांनी तीला भाजप कार्यालयात व पुन्हा भाजप कार्यालयातून या कोंबडीला बाहेर फेकण्यात आले व अखेर तीने प्राण सोडले. यानंतर या मृत कोंबडीला कोणीतरी या ठिकाणाहून उचलून घेऊन गेले.
दुसरी कोंबडी भाजप कार्यालयात
अन्य एका कोंबडीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठेवले होते. या ठिकाणी तीला पाणी देण्यात आले होते. यासह पशुचिकित्सकांबाबतही भाजपच्या महानगराध्यक्षांनी विचारणा केली होती. तसेच याबाबत तक्रार देण्याबाबतही भाजपच्या कार्यकर्त्यांची चर्चा सुरू होती. मात्र, ही कोंबडीही जखमी झाली आहे.
गुन्हे दाखल व्हावेत
एखाद्या पक्षी किंवा प्राण्याला तुमच्या आंदोलनात अशा क्रुरतेने वागविणे त्यांच्यावर अत्याचार करणे हा ॲनीलम क्र्युॲलिटी ॲक्टनुसार गुन्हा आहे. पोलिसांनी तातडीने याबाबतीत गुन्हा दाखल करावा. - राजेंद्र गाडगीळ, पक्षीमित्र