जळगाव : शनिवारी रात्री पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने ममुराबाद गावातील विविध भागांमध्ये अक्षरश: गुडघ्याएवढे पाणी साचले होते. अनेक घरांमध्ये पाणीही शिरले. दुसरीकडे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली. त्यामुळे तेथील नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
ममुराबाद परिसरात शनिवारी रात्री ११ वाजता दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होता. गेल्या चार ते पाच वर्षांनंतर या भागामध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये प्रचंड पाणी साचले होते. भिल्ल वस्तीत पूरसारखी स्थिती पाहायला मिळाली. या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर ट्रॅक्टर अर्धे पाण्यात बुडाले होते. अक्षरश: नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. तसेच ममुराबाद रस्त्यावरील शेतांमध्येसुद्धा पाणी साचल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रविवारी सकाळपासून शेतकरी बांधव मोटारच्या साहाय्याने शेतातील पाणी बाहेर काढताना दिसून आले.