कळमसरे, ता. अमळनेर : येथील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीखाली दबले जाऊन मृृृत्युमुखी पडलेल्या हिराबाई मोतीलाल भिल यांचे वारस पती मोतीलाल भिल यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत चार लाखांचा धनादेश आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, कळमसरे सरपंच जगदीश भाईदास निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग राजपूत, एकलव्य सेनेचे किशोर मालचे, पंचायत समिती सदस्य श्याम अहिरे, न.पा. सदस्य दीपक पाटील, डॉ. रामू पाटील आदी उपस्थित होते.
३१ मे २०२१ रोजी दुपारी पाडळसे रोडलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाची जीर्ण भिंत अंगावर कोसळल्याने हिराबाई मोतीलाल भिल (वय ५०) या महिलेचे जागीच निधन झाले होते. मृत हिराबाई लहान मुलगा व पतीसह पाडळसे रस्त्यास लागून झोपडीवजा घरकुलात राहत होते. उत्पन्नाचे काही साधन नसल्याने पती-पत्नी मोलमजुरीवर उपजीविका भागवीत होते. उपसरपंच जितेंद्रसिंग राजपूत यांनी कै. हिराबाईच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मदतीसाठी सतत पाठपुरावा केला होता. एकलव्य सेनेनेदेखील निवेदनातून मदतीची मागणी केली होती.