हरताळा, ता.मुक्ताईनगर : रोहिणी नक्षत्राने बोहनी केल्यानंतर चांगली सुरुवात झाली, परंतु मृग नक्षत्राचे तीन दिवस उलटले, तरीही पावसाचा पत्ता नसल्याने, खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पावसासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
गेल्या वर्षी परतीच्या पावसाचा फटका सहन करत, पुन्हा आता उमेदीने खरिपासाठी कंबर कसली आहे. हवामान शास्त्र प्रगत झाले असले, तरी पावसाचे अंदाज बांधताना बऱ्याच वेळेस तफावत झाल्याचे पूर्वी दिसून आले आहे. शेतकऱ्यांना असलेल्या प्राचीन अवघड ज्ञानाची सहसा चूक होत नाही. प्राचीन ज्ञान लेखी स्वरूपात नसले, तरी शेतकऱ्यांसाठी भाकीत महत्त्वाचे मानले जाते. रोहिणी नक्षत्र शेवटी तारखेला जलधारांनी सुरुवात चांगली झाली. ११ जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. केवळ पांढरे ढग आकाशात दिसत आहेत. शेतकऱ्यांनी शेतीची आंतर मशागत पूर्ण करीत काही शेतकऱ्यांनी बागायती कापूस तर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करत, आता शेतकरी पेरणीच्या तयारीत लागला असून, पेरणीसाठी लगबग दिसून येत आहे. मात्र, पावसाने डोळे वटारले आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेला लॉकडाऊनमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे बियाणे कीटकनाशके, खते खरेदी करण्यासाठी नव्या उमेदीने जात आहे. सगळीकडे शेतकरी अगदी घाई गडबडीमध्ये आहे.
दरवर्षी मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती या नक्षत्रावर शेतकऱ्या अंदाज बांधत असतो. त्यामुळे प्रत्येक नक्षत्राची हजेरी महत्त्वाची शेतकऱ्यांच्या जीवनात मानली जात असताना, आजही मृग नक्षत्राच्या प्रतीक्षेत बळीराजा दिसत आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला ३ व ४ जूनला रोहिणी नक्षत्रात शेवटी जलधारा दिल्या. आता मान्सूनचा पाऊस चांगला होईल, अशी अशा शेतकऱ्यांच्या मनात असताना शेतकऱ्याने आता खरिपाची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, मृग नक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सुतार कारागिरांचा व्यवसाय बंद होता. रोजीरोटी मिळावी, म्हणून त्यांनीही आपला व्यवसाय सुरू केल्याचे दिसून येत आहे. डवरे, तिफन, पास, कोळपे, खुरपे आदी अवजारे घेऊन शेतकरी सुतार, लोहाराकडे जात असल्याचे दिसत आहे, पण शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.