लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डेंग्यूच्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना सप्टेंबर महिन्यातील ग्रामीण व शहरी असे एकूण १६९ अहवाल प्रलंबित आहेत. सप्टेंबर महिन्यात ७ नव्या रुग्णांची शासकीय दप्तरी नोंद असून प्रलंबित अहवालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
गेल्या महिना दोन महिन्यांपासून विषाणूजन्य आजारांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातच जिल्ह्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. कोविड प्रमाणचे डेंग्यूच्या विषाणूतही बदल होत असल्याची स्थिती काही ठिकाणी समोर येत असताना जिल्ह्यात मात्र तसे चित्र नसल्याचे हिवताप विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून ते सप्टेंबरपर्यंतच्या बाधितांची संख्या ४२ झाली आहे.
शासकीय दरबारी एकाही मृत्यूची नोंद नाही
डेंग्यूमुळे यावर्षी एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. नुकत्याच दोन तरुणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, हे दोनही रुग्ण खासगीत बाधित असताना शासकीय अहवाल त्यांचे निगेटिव्ह होते, शिवाय मृत्यू झाल्यानंतर मृत्यू परीक्षण समितीची सभा होते. त्यामुळे डेंग्यूने जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद नसल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. लांडे यांनी दिली.
सप्टेंबर महिन्याची स्थिती
ग्रामीण
अहवाल : १७०
बाधित : ५
प्रलंबित अहवाल : ११९
शहर
अहवाल ९५
बाधित २
प्रलंबित अहवाल ५०