जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात रोज नवनवीन पैलू समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित महेंद्र पांडुरंग राजपूत याने घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एक व्हिडिओ तयार केला व तो फेसबुकवर व्हायरल केला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने स्वत:च निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करुन या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. रोजच्या नवनवीन पैलूमुळे तपासाचा गुंता अधिकच वाढत चालला असून नेमकी सत्य घटना व कारण याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान, घटनेनंतर पसार झालेल्या महेंद्र राजपूत याला मध्यरात्री म्हसावद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेली कार म्हसावद गावातील एकवीरा मंदिराजवळ तीन दिवसांपासून बेवारस स्थितीत होती, मंगळवारी या कारची खऱ्या अर्थाने वाच्यता झाली. कार म्हसावदला असल्याचे समजताच तपासाधिकारी संदीप परदेशी, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संजय सपकाळे, संदीप महाजन, अजय सपकाळे, प्रवीण जगदाळे व सुशील चौधरी यांचे पथक रवाना झाले. म्हसावद दूरक्षेत्राचे समाधान पाटील व हेमंत पाटील यांच्या मदतीने कार (क्र.एम.एच.४८ एफ.१४२२) आधीच ताब्यात घेण्यात आली होती. बुधवारी सकाळी महेंद्र याला न्यायालयात हजर केले असता ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यातील जुगल बागुल, भूषण बिऱ्हाडे व महेंद्र राजपूत असे तिघे जण फरार आहेत. दरम्यान, गोळीबारानंतर पळून गेलेल्यांच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी रात्रभर नियंत्रण कक्ष तयार केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र वारुळे व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर तांत्रिक विश्लेषण करुन पथकाच्या संपर्कात होते, तेव्हा दोन संशयित हाती लागले.
पोलिसांसमोर आव्हान आणि जनतेतील प्रश्न
-हा गुन्हा घडल्यापासून रोज नवनवीन पैलू समोर येत आहेत. फिर्यादी कुलभूषण पाटील यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी गोळीबार केला त्यांना मी ओळखत नाही. कधी भेट झाली नाही. यात राजकीय षडयंत्र आहे, असे ते सांगतात तर, दुसरीकडे या गुन्ह्यात मुख्य संशयित असलेल्या महेंद्र राजपूत याच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माझा पती निर्दोष आहे. उपमहापौरांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आमच्याकडे पिस्तूल नाही, सत्तेचा गैरवापर त्यांच्याकडून केला जातोय. पोलिसांवर आमचा विश्वास आहे. निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे असे त्या म्हटल्या आहेत.
-महेंद्रने व्हिडिओच्या माध्यमातूनही पिस्तूल आपल्याकडे नाहीच. कुलभूषण पाटील यांनी वाद मिटविण्यासाठी बोलावले व त्यांच्याकडे गेलो असता नितीन राजपूत याने कमरेतून पिस्तूल काढून दम द्यायला सुरुवात केली. काही घटना घडण्यापूर्वीच झटापट झाली. पिस्तूल हिसकावून त्यांच्याच गाडीखाली फेकून तेथून पलायन केले. त्यानंतर कुलभूषण यांच्या घराजवळ गोळीबार झाल्याचे माहिती पडले. ही स्टंटबाजी व राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे. सत्य समोर येईल, पोलिसांवर विश्वास आहे असे या व्हिडिओत त्याने नमूद केले आहे.
- या प्रकरणातील प्रत्येकाची पार्श्वभूमी काय आहे. कुलभूषण यांची फिर्याद, महेंद्रची पत्नी व बहिणीने प्रसारमाध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रिया व महेंद्रने व्हायरल केलेला व्हिडिओ यात नेमके किती तथ्य आहे. खरी घटना नेमकी काय आहे, हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, आणि हेच सत्य शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.