एरंडोल : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या मागण्यांसंदर्भात आयुक्तांची भूमिका पूर्वग्रह दूषित व वेळकाढूपणाची असल्याप्रकरणी मंगळवारपासून आंदोलनास सुरुवात झाली आहे.
एरंडोल तालुक्यातील सर्व पशुचिकित्सक व कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज लसीकरण, सर्व प्रकारचे ऑनलाइन, मासिक व वार्षिक अहवाल देणे बंद, आढावा बैठकांना अनुपस्थिती, अशा स्वरूपाचे काम बंद आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात आमदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १६ जुलैपासून कायद्याप्रमाणे काम करण्यात येणार आहे.
आंदोलनासंदर्भात सहायक गटविकास अधिकारी सपकाळे यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. पी.आर. पाटील, उपाध्यक्ष डॉ. राहुल साळुंखे, सरचिटणीस डॉ. सुभाष सोनवणे, डॉ. आर.डी. चिंचोरे, डॉ. हेमंत नागणे, पल्लवी सपकाळे आदी उपस्थित होते.