जळगाव : हैद्राबादमधील कोल्लुर येथे महिला पशुवैद्यकीय अधिकारी युवती दिशा हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा महाराष्टÑ राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. त्यात या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.तेलंगणा राज्यातील हैद्राबादमधील कोल्लुर येथे शासकीय सेवेतील कर्तव्य बजावत असताना महिला पशुवैद्यकीय अधिकारी युवतीवर अत्याचार करीत तिची हत्या करून जाळून टाकल्याची अमानवीय घटना घडली आहे. याबाबत महाराष्टÑ राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना जळगाव शाखेतर्फे बुधवारी सकाळी ११ वाजता शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. सर्व आरोपींना तत्काळ शासन होण्यासाठी फास्टट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी व्हावी, आरोपींना मरेपर्यंत फाशीपेक्षाही जास्त तीव्रतेची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ.पी.एल.राणे, कार्यकारी अध्यक्ष डॉ.एन.आर.पाटील, उपाध्यक्ष डॉ.पी.एस.इंगळे, डॉ.डी.ए.शिंपी, सचिव डॉ.नितीन सोनवणे आदींच्या सह्या आहेत. मोर्चात पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.गोलाणी मार्केटमध्येदेखील विविध संघटनांतर्फे दिशाला श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.
हैद्राबाद येथील युवतीवरील अत्याचाराच्या घटनेचा पशुवैद्यकीय संघटनेतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 23:11 IST