जळगाव : जळगाव-पाचोरा रस्त्यावरील शिरसोलीजवळ असलेल्या एका हॉटेलाबाहेर वृत्तपत्रांना माहिती पुरवित असल्याच्या संशयावरून राजकीय पुढारी व वाळू व्यावसायिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक होऊन शिविगाळ झाली. हा प्रकार बुधवारी रात्री ८ वाजता घडला. दरम्यान, हॉटेलात बिअरची बाटलीसुद्धा फोडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही वाळू व्यावसायिक जळगाव-पाचोरा रस्त्यावरील शिरसोली गावाजवळ काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये बसले होते. काही वेळातच एक पुढारी त्याठिकाणी आला. काही वेळाने अवैध वाळू व्यावसायिक व त्या पुढाऱ्यात हॉटेलबाहेर वाद सुरू झाला. जोरदार शाब्दिक चकमक होऊन वृत्तपत्रांना माहिती पुरवित असल्याच्या संशयावरून वाळू व्यावसायिकांनी त्या पुढाऱ्यास शिविगाळ केली. दरम्यान, गोंधळ निर्माण झाल्यामुळे हॉटेलाबाहेर चांगलीच बघ्यांची गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, एका वाळू व्यावसायिकाने हॉटेलात बिअरची बाटलीसुद्धा फोडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अर्धा ते एक तास हा गोंधळ सुरू होता. वादाचे रूपांतर हाणामारीत होईल, तोच काहींनी समजूत घातल्यानंतर वाद शांत झाला.