जळगाव : ऐन गौरी उत्सवादरम्यान भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारात केवळ हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कांदे, बटाटेच अधिक दिसत आहेत. पावसामुळे आवकेवर परिणाम झाला असून पालेभाज्यांमध्ये मेथीचा भाव तर १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.
गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी येणाऱ्या गौरी उत्सवानिमित्त कुटुंब एकत्र येत असते. शिवाय गौरीच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी गौरींना नैवेद्य दाखविण्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांची खरेदी केली जाते. त्यात कुटुंबातील सदस्य एकत्र आल्याने घरात भाज्यादेखील मोठ्या प्रमाणात लागतात. नेमकी याच काळात सध्या भाज्यांची आवक घटली आहे.
पावसामुळे काढणीत अडचणी
गेल्या आठ ते १० दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतातून भाजीपाला काढताना अडचणी येत आहेत. शेतात पाणी असल्याने भाजीपाला काढणे अवघड होत आहे. त्यात पालेभाज्यांवर अधिक परिणाम झाला आहे. त्यामुळे मेथी, पालक, कोथिंबीर, पोकळा हे तर मिळणे कठीण होत आहे. आवक घटल्याने मेथीचा भाव ८० ते १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. एरव्ही १० ते १५ रुपये असणारी पालकाची जुडी २५ रुपयांना मिळत आहे. तसेच मध्यंतरी कमी झालेल्या कोथिंबिरीचे भाव पुन्हा वाढून ते ८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
आवक घटली, भाव वधारले
सध्या आवक कमी असल्याने येणाऱ्या जेमतेम मालाचे भाव मात्र चांगलेच वधारले आहेत. ३० रुपयांवर असलेले वांगे व फूलकोबी प्रत्येकी ५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. बटाट्यांच्या भावात पाच रुपयांनी वाढ होऊन ते २५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. यासोबतच गंगाफळ, गिलके, लिंबू यांचेही भाव वाढले आहे. टोमॅटो मात्र अजूनही १५ रुपये प्रतिकिलोवर आहेत.