पहूर, ता. जामनेर : पिंपळगाव कमानी तांडा, ता. जामनेर येथे मासिक बैठक संपल्यानंतर दोनजणांनी घरकुल प्रकरणावरून ग्रामपंचायत कार्यालयात धुडगूस घातल्याची घटना मंगळवारी घडली. यादरम्यान साहित्याची तोडफोड करीत महिला सरपंचांना शिवीगाळ केल्याचे सांगितले. याप्रकरणी दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमानी तांडा येथे ग्रामपंचायतीची बैठक संपल्यानंतर एकनाथ नारायण चव्हाण व प्रेमसिंग मोरसिंग राठोड हे ग्रामपंचायत कार्यालयात आले. सरपंचांना बोलवा अशी मागणी करून घरकुल प्रश्नावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावरच न थांबता त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील शासकीय साहित्याची तोडफोड केली व महिला सरपंचांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, असे सरपंच प्रियंका रामेश्वर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून, एकनाथ चव्हाण व प्रेमसिंग राठोड यांच्याविरुद्ध पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस भरत लिंगायत करीत आहेत.
प्रतिक्रिया
संबंधितांनी मासिक बैठक संपल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये येऊन धुडगूस घातला. आपणास शिवराळ भाषा वापरून मारण्याची धमकी दिली. शासकीय साहित्याची तोडफोड केली.
- प्रियंका रामेश्वर चव्हाण, सरपंच, पिंपळगाव कमानी तांडा ग्रामपंचायत.
प्रलंबित घरकुल प्रकरणसंदर्भात संबंधितांचा जुना वाद आहे. माझी नुकतीच याठिकाणी नियुक्ती झाली असल्याने याबाबत कोणतीही पार्श्वभूमी मला माहिती नाही. माझी पहिलीच मीटिंग होती.
-संदीप रमेश वानखेडे, ग्रामसेवक.