अमळनेर : सतत गर्दीत आणि शेतकऱ्यांमध्ये वावरणाऱ्या बाजार समिती कर्मचारी, हमाल, मापाडी, गुमास्ता व व्यापारी यांच्यासह ४६८ जणांना लसीकरण करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी, विक्री, देवाण-घेवाण तसेच बाहेरील शेतकऱ्यांची आवक यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना संसर्गाची भीती अधिक होती. समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी बाजार समितीमधून कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कर्मचारी, व्यापाऱ्यांसह हमाल मापाडी यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते.
एकाच दिवसात बाजार समिती संबंधित सर्व व त्यांचे कुटुंबीय यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांच्यासह परिचारिका, आरोग्यसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी सहकार्य केले.
या वेळी पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, दीपक पाटील, डॉ. रामराव पाटील, विनोद सोनवणे, नितीन भदाणे, बाजार समिती सचिव उन्मेष राठोड उपस्थित होते.