जळगावातील युवकांचे मत : न घाबरता लस घेण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लस आताच्या गंभीर परिस्थितीत आवश्यकच आहेत. ती घेतली गेलीच पाहिजे. त्यामुळे न घाबरता सर्वांनी ही लस घ्यावी, मात्र, दुसरीकडे ही मोहीम सोयीची होण्यासाठी प्रशासनाने केंद्र वाढविणे गरजचे असल्याचे मत लसीकरण झालेल्या युवकांनी व्यक्त केले आहे.
केंद्र निवडण्यात अडचणी
नोंदणी झाली तरी केंद्र मिळत नसल्याने आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लस मिळत नाहीय. दररोज प्रशासनाने सांगितलेल्या वेळेत आम्ही ऑनलाइन असतो मात्र, काही सेंकदात केंद्र फुल्ल होत आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे लस मिळेल की नाही, असाही प्रश्न आहे. - अक्षय चौधरी, अयोध्यानगर
कोट
लस घेतली केवळ हाताला काही वेळ वेदना झाली बाकी कसलाच साईड इफेक्ट नाही. लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनीच ती घ्यावी. काहीतरी साईड इफेक्ट होईल या गैरसमजातून घाबरून लस घेणे टाळू नये, आताच्या गंभीर परिस्थितीत लस आवश्यक आहे. प्रशासनाने परिसरानुसार केंद्र वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहील व सर्वांना वेळेत लस मिळेल. - गणेश नरेंद्र चौधरी
लसीकरणाचा अनुभव चांगला होता. केवळ थोडा ताप आला. तरुणांनी न घाबरता लस घ्यावी, ग्रामीण भागातील लोकांनीही न घाबरता लसीकरणाला समोर यावे, आताच्या कोरोनाच्या संसर्गात व तिसऱ्या लाटेची वर्तविण्यात आलेल्या शक्यतेत लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. केेंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे केंद्र वाढविणे हे होय - विशाल सुभाष बुंदे
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांनी लस घ्यावी. ज्याप्रमाणे मतदानाचा हक्क आपण बजावतो तसा लसीकरणाचा हक्कही आपण पूर्ण करायला हवा. तरुणांना लवकर लस मिळावी, यासाठी केंद्र अधिकाधिक असावे, प्रशासन व शासनाने या समन्वयाने व्यापक लसीकरण मोहीम राबविणे आवश्यक आहे. - पवन रमेश बारी