जळगाव : मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलीच्या वडिलांना फोन करून नियोजित वर मुलाविषयी गैरसमज पसरविल्याचा जाब विचारला असता भावानेच उपवर पुतण्या व भावाला मारहाण केल्याची घटना मेहरुणमधील नीळकंठनगरात घडली. याप्रकरणी रविवारी पाच जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास बळीराम ढोले (वय ५४,रा.रेणुकानगर, मेहरुण) यांचा मुलगा अजय याचे मुक्ताळ, ता.बोदवड येथील युवराज हिवाळे यांच्या मुलीसोबत लग्नाची बोलणी सुरू आहे. मुलगी पाहण्याचाही कार्यक्रम झालेला आहे, असे असताना हिवाळे यांनी विकास ढोले यांना फोन करून कळविले की, भाऊ शांताराम ढोले यांनी सांगितले की, अजय हा कामधंदा करीत नाही, त्याला तुम्ही तुमची मुलगी का देत आहात. याचा जाब विचारण्यासाठी विकास ढोले हे भाऊ शांताराम याच्याकडे गेले असता त्यांनी घरातून लोखंडी पट्टी आणून मारहाण केली तर बाळू व नंदू यांनी अजय याला डोक्यावर रॉड मारला. पत्नी प्रमिला यांनाही मारहाण केली. नातेवाईकांनी सोडवासोडव करून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. विकास ढोले यांच्या फिर्यादीवरून शांताराम बळीराम ढोले, संजय शांताराम ढोले, नंदू शांताराम ढोले, बाळू ऊर्फ विश्वास शांताराम ढोले व उज्ज्वला शांताराम ढोले यांच्याविरुध्द रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार करीत आहेत.