ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.4 - शहरातील भारतनगर आणि पवननगरात गोळीबार प्रकरणात शहर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना सोमवारी अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
शहरातील रहिवासी गौरव बढे आणि आकाश उर्फ नंदू माने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना भुसावळ रेल्वे स्थानकावरुन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पाच आरोपी आधीच अटकेत आहेत. आता अटकेतील आरोपींची संख्या सात झाली आहे.
या प्रकरणात 29 जून रोजी खिरोदा येथून रणवीर उर्फ राणू बॉक्सर विजय इंगळे (21, शांतीनगर, भुसावळ), करण किशन इंगळे (21, राहुलनगर, भुसावळ) व दीपक श्रावण लोखंडे (22, आरपीएफ बॅरेकजवळ, भुसावळ) यांना तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत 4 रोजी संपणार आहे. त्यांना 4 रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याआधी श्यामल शशिकांत सपकाळे (कोळी) व सुशील संजय इंगळे ( रा.पिंप्राळा, जळगाव) यांना जळगावातून अटक करण्यात आली आहे. हे दोन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
भारतनगर आणि पवननगरात गेल्या 25 रोजी गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबारात निखिल झांबरे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याचा भाऊ सुमित झांबरे आरोपींनी केलेल्या चाकूहल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत मोरे अधिक तपास करीत आहेत.