ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.3 - पोलिसांनी तालुक्यातील बोरअजंटी गावापुढे सापळा रचून एकाजवळून दोन गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केल्याची कारवाई रविवारी दुपारी चार वाजता केली. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे, तर एक जण फरार झाला.
मध्य प्रदेशातून एक इसम गावठी पिस्तूल व काडतुसे चोपडय़ाकडे घेऊन येत असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक सूरज मधुकर पाटील यांना मिळाली.
त्यांनी चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांना माहिती देत सोबत पंच, हवालदार तस्लीमखान पठाण यांना घेऊन बोरअजंटी गावापुढे सापळा रचला. दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांनी वैजापूरकडून चोपडय़ाकडे येणारी मोटारसायकल (एमपी 46-7570) अडविली. पोलिसांनी मोटारसायकल अडवताच चालक फरार झाला. तर मागे बसलेल्या सायसिंग भोंग्या बारेला (30, रा. निरगुडय़ा, ता. वरला, जि.बडवाणी) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दोन गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आढळून आली. या सर्वाची एकूण किंमत 43 हजार रुपये आहे.
सुरज पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी सायसिंग बारेला याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.