जळगाव : मेहरुणमधील अक्सा नगर, सालार नगर व रामानंद नगर हद्दीतून एकाच रात्री तीन चारचाकी व एक दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. त्यापैकी एका कारची काच फोडून ही कार रस्त्यावर सोडून देण्यात आली आहे. दरम्यान, महामार्गाला लागून असलेल्या हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये चोरी करण्यासाठी आलेली एक कार सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. ती कार चोरीसाठीच वापरल्याचा संशय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सालार नगरातून युनूस युसूफ मनियार यांच्या मालकीची कार (क्र.एम.एच २० सी.एच ८७८६) चोरट्यांनी रविवारी पहाटे ४ वाजून २८ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरासमोरुन चोरुन नेली. ही घटना सकाळी सात वाजता उघडकीस आली. अक्सानगरातील अकील शाकीर सय्यद यांच्या मालकीची कार (क्र.एम.एच ०२ एन.ए ४०१७) २ वाजून ३५ मिनिटांनी चोरट्यांनी चोरुन नेली आहे. या दोन्ही घटनेत बनावट चाव्यांचा वापर केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सालार नगरात कार चोरीसाठी येतांना त्यांनी एक दुचाकी आणली व ती जागेवर सोडून दिली आहे. रामानंद नगरात कारची काच फोडण्यात आली. ती रस्त्यातच सोडून देण्यात आली आहे.