Twenty-two lakhs of gutka seized | अडीच लाखाचा गुटखा जप्त
अडीच लाखाचा गुटखा जप्त


मुक्ताईनगर : शहरातील रेणुकानगर परिसरातून चारचाकीत अवैधरित्या गुटखा वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहिती वरून पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत २ लाख ४० हजार रुपयाच्या गुटख्यासह दहा लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.दरम्यान, आरोपींनी पोलिसांना तुम्हाला बघून घेवू अशी धमकी दिली.
पोलीस कर्मचारी फिर्यादी कांतिलाल रघुनाथ केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी नारायण जयसिंग पवार (३५), मुलचंद रामदास राठोड (४७), रा. मुंदखेडा तालुका जामनेर व वैभव नेमीचंद गलवाडे रा. मुक्ताईनगर हे गुटख्याची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.त्यानुसार १३ एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अशोक उजागरे, कांतिलाल केदारे, कल्पेश आमोदकर,नितीन चौधरी, देवसिंग तायडे यांच्या पोलीस पथकाने रेणुका नगर परिसरात छापा टाकला.
प्रसंगी चारचाकी वाहन क्रमांक एमएच १९- सीएफ-४५९९ या वाहनात दोन लाख ४० हजार रुपयांचा गुटखा भरून त्याची वाहतूक करण्यात येत होती.पोलीस पथक वाहनाच्या समोर गेले असता चालक नारायण पवार याने गाडी भरधाव वेगाने पळवली मात्र पोलिसांनी पाठलाग करत गाडी अडवून नारायण पवार व मूलचंद राठोड या दोघांना ताब्यात घेतले.याप्रसंगी दोघांनी पोलिसांना तुम्हाला बघून घेईल अशी धमकी देखील दिली. तसेच या दोघांनी मुक्ताईनगर येथील वैभव नेमीचंद गलवाडे यांच्याकडून हा गुटखा विकत घेतल्याची माहिती मिळाल्याने त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. मुक्ताईनगर न्यायालयात १५ एप्रिल रोजी आरोपींना हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


Web Title: Twenty-two lakhs of gutka seized
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.