भुसावळ : मध्य प्रदेशात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मध्य रेल्वेतील इटारसीजवळ रेल्वे रुळांवर अनेक झाडे पडली. ओएचईच्या तारा तुटल्या. विद्युत खांब वाकले. परिणामी हावडा, ताप्ती गंगा एक्स्प्रेससह इतर गाड्या उशिराने धावत आहेत.
पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात गुर्रा-बगरतवा स्टेशनदरम्यान झालेल्या वादळामुळे अनेक झाडे रेल्वे रुळावर पडली. याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. अप-डाऊन रेल्वे वाहतूक दोन्ही ट्रॅकवर थांबली होती. ताप्ती गंगा एक्स्प्रेस, हावडा, काशी, राप्ती सागर, गुवाहाटी, छपरा, साकेत, मंडुआडिह, पाटलीपु्त्र, महानगरी एक्स्प्रेससह इतर गाड्यांची चाके थांबली. या गाड्या गुरुरा, बगरतवा, सोनतलाई, सोहागपूर, इटारसीसह अन्य स्थानकांवर उभ्या केल्या आहेत. इटारसी आणि पिपरिया रेल्वेस्थानकांवरून टॉवर व्हॅन दुरुस्तीच्या कामासाठी निघाली. गुर्रा-बगरतवादरम्यान ओएचई वायरवर बरीच झाडे पडल्याचे वृत्त आहे.
तसेच भुसावळ स्थानकावर येणाऱ्या गाड्यांच्या विलंबाची परिस्थिती शुक्रवारी रात्रीपर्यंत राहणार आहे. ०८६०९ अप, रांची-लो.टि.टर्मिनस रांची एक्स्प्रेस ८.३० तास उशिरा धावत आहे. ०२१९४ अप, वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस ५.४० तास उशिरा धावत आहे. ०२३२१ अप हावडा-मुंबई कलकत्ता मेल ५.२५ तास उशिरा धावत आहे. ०२१४२ अप पाटलीपुत्र- लो. टि. टर्मिनस पाटलीपुत्र सुपरफास्ट एक्स्प्रेस सहा तास उशिरा धावत आहे. ०२१६८ अप, मंडुआडिह-लो. टि. टर्मिनस वाराणसी सुपरफास्ट एक्स्प्रेस ५.४० तास उशिरा धावत आहे. ०१०६८ अप, फैजाबाद- लो. टि. टर्मिनस साकेत एक्स्प्रेस, अडीस तास उशिरा धावत आहे. ०१०६० अप छपरा-लो. टि. टर्मिनस छपरा एक्स्प्रेस, सात तास उशिरा धावत आहे. ०९१४८ अप भागलपूर- सुरत भागलपूर एक्स्प्रेस १.१५ तास उशिरा धावत आहे. ०५०१८ अप गोरखपूर-लो. टि. टर्मिनस काशी एक्स्प्रेस अडीच तास उशिरा धावत आहे. ०५६४६ अप गौहाटी- लो. टि. टर्मिनस गुवाहाटी एक्स्प्रेस १.१५ तास उशिरा धावत आहेत.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे झाडे व झाडाच्या फांद्या रेल्वे रुळावर पडल्या. ओव्हरहेड इलेक्ट्रिकल (ओएचई ) लाइनदेखील खराब झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ४.४८ पासून रेल्वे ट्रॅक बंद आहे. इटारसी-पिपरिया रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे वाहतूक तीन तास बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे टॉवर व्हॅनची टीम सुधारण्याचे काम करीत आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर मुंबई व दिल्ली मार्ग सुरळीत करण्यात आला.