जळगाव : सावखेडा बुद्रुक गावातील नदीपात्रातून अवैैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी पकडले. दोन्ही ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली असून, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन बाविस्कर यांना शुक्रवारी रेकॉर्डवरील आरोपींना तपासण्याची ड्यूटी नेमण्यात आली होती. त्यानुसार ते पिंप्राळा-हुडको व सावखेडा बुद्रुक येथे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असताना, त्यांना सावखेडा बुद्रुक गावाकडून पिंप्राळाकडे दोन वाळूने भरलेले ट्रॅक्टर जाताना दिसून आले. त्यांनी लागलीच दोन्ही ट्रॅक्टर थांबवून वाळूबाबत चौकशी केली. दरम्यान, चौकशीअंती अवैैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. तर सुरेश उत्तर खैरे (२२), दीपक गोकुळ बाविस्कर (२६, दोन्ही रा.सावखेडा बुद्रुक) अशी ट्रॅक्टर चालकांनी त्यांची नावे पोलिसांना सांगितली. अखेर तालुका पोलिसांच्या मदतीने दोन्ही ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तर याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.