खान्देशलगत असलेल्या खंडवा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नंदकुमार सिंह चौहान हे कोरोनामुक्त होऊनही त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.त्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना, मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनतर दिल्ली येथून त्यांचे पार्थिव शाहपूर(ता. जि. बऱ्हाणपूर) येथे आणून, बुधवारी दुपारी त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीहून बुधवारी एका विशेष विमानाने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, सामाजिक न्यायमंत्री धावरचंद गेहलोत व पोलाद राज्यमंत्री फगन सिंग कुलास्ते जळगाव विमानतळावर आले होते. यावेळी त्यांच्या सोबत खासदार ज्योतीराज सिंधियाही उपस्थित होते. तिघे मंत्री एकाच विमानातून जळगावला सकाळी साडेअकरा वाजता आले व या ठिकाणाहून शासकीय
वाहनाने बऱ्हाणपूरकडे रवाना झाले.
विमानतळावर त्यांच्या स्वागतावेळी उपमहापौर सुनील खडके, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व राधेश्याम चौधरी उपस्थित होते.
इन्फो :
मंत्री महोदयांनी भरिताचा घेतला स्वाद :
जळगाव विमानतळावर तिन्ही महोदयांनी खान्देशचा प्रसिद्ध मेनू असलेल्या भरिताचा आस्वाद घेतला. खासदार रक्षा खडसे यांनी घरून स्वयंपाक करुन विमानतळावर डबा घेऊन आल्या होत्या. भरितासह भेंडीची भाजी, भाकरी, पोळी आदी मेनूचा आस्वाद घेऊन ते पुढे बऱ्हाणपूरला रवाना झाले. सायंकाळी पुन्हा सहा वाजता मंत्री महोदय बऱ्हाणपूरहून जळगावला येऊन विमानाने दिल्लीला रवाना झाले.
इन्फो :
पुणे, इंदूर विमानसेवेबाबत चर्चा
यावेळी मंत्री महोदयांशी खासदार रक्षा खडसे यांनी जळगावहून पुणे व इंदूरसाठी सेवा सुरू करण्याची मागणी केली. या तोमर यांनी या सेवेबाबत प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले. तसेच विमानतळावरील इतर रखडलेले प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन तोमर यांनी दिले असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले.