स्टार : ८४५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने एसटी प्रवासी वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आली आहे. परंतु अद्यापही ग्रामीण भागात प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत नसल्याने, काही बसगाड्या बंदच आहेत. सुमारे जळगाव आगारातील पंचवीस ते तीस टक्के बसेस यामुळेच बंद असून, प्रवाशांना इतर आगारांच्या बसेस किंवा ऑटोरिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर एसटी प्रवासी वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आली. त्यात जळगाव आगाराकडून जवळपास सर्वच मार्गावर एसटी बसेस सुरू करण्यात आल्या. जळगाव आगारात एकूण १०३ बसेस आहेत. मात्र, ग्रामीण भागातून मिळणाऱ्या अल्पप्रतिसादामुळे या आगारातील तीस टक्के बसेस बंद आहे तर सत्तर टक्के बसेस सुरू आहे. दरम्यान, तीस टक्के बसेस या आगारातील विविध कामांसाठी त्यांचा वापर होत आहे. तसेच रोटेशन पद्धतीने बसेसचा वापरही होत आहे.
ग्रामीण भागात अल्पप्रतिसाद
खेडेगावांमध्येही बससेवा सुरू करण्याचे जळगाव आगाराने नियोजन आखले होते. मात्र, अल्पप्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. परिणामी, खेड्यापाड्यातील बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. कानळदा, नांद्रा, फुपनगरी तसेच निंभोरा आदी ठिकाणीही बससेवा बंद आहे. दुसरीकडे कोरोनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद नसून, हा प्रतिसाद वाढताच बसगाड्या सुरू केल्या जाणार आहेत. काही नादुरुस्त बसेस दुरुस्तीसाठी पाठविल्या असून, त्या दुरुस्त होताच काही गावात एसटीची बस सुरू होईल.
--------------
प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार
-कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली तरी ग्रामीण भागात बस पोहोचत नसल्याने ऑटोरिक्षा, काळीपिवळीचा आधार प्रवासी घेत आहेत.
- ग्रामीण भागांतील रस्त्यांची अवस्थाही वाईट असल्याने बसगाड्या बंद असून, अनेक प्रवासी दुचाकी, ऑटोचा आधार घेत आहेत.
- काही गावात एसटीची बससेवा अनेक वर्षांपासून बंद असल्याने या गावांतील लोकांना काळीपिवळी, ऑटोरिक्षाशिवाय पर्यायच नाही.
---------------------
-प्रतिक्रिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसेस बंद होत्या. त्यामुळे खासगी वाहनाने कामाच्या ठिकाणी ये-जा करावी लागत होती. आता बसेस सुरू झाल्यामुळे सोयीचे होत आहे.
- संदीप पाटील
गावाच्या थांब्यावर कधी कधी बस थांबत नाही, त्यामुळे टमटमचा आधार घ्यावा लागतो. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात गैरसाेय झाली. खासगी वाहनाचे भाडे परवडेनासे झाले होते.
- नारायण महाजन
--------------
एकूण बसेस
- १०३
एकूण चालक
- २४५
एकूण वाहन
- २४०