जळगाव : कोरोना काळात आर्थिक घडी विस्कटलेली एसटी महामंडळाची सेवा गेल्या महिन्यापासून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, महामंडळाच्या राज्यातील नाशिक, अहमदनगर व पुणे विभागांमधील काही आगारांमध्ये पुरेशा उत्पन्नाअभावी डिझेल खरेदीसाठीही पैसा नसल्यामुळे, या आगारातील निम्म्या बस आगारातच उभ्या आहेत. मात्र, महामंडळाच्या जळगाव विभागाचा याला अपवाद असून, सध्या या विभागात डिझेलच्या खरेदी व इतर खर्चासाठी बऱ्यापैकी उत्पन्न येत असल्यामुळे जळगाव विभागात कुठेही डिझेलचा तुटवडा नसल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे महामंडळाची बससेवा अनेक महिने ठप्प असल्यामुळे, महामंडळाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. परिणामी यामुळे दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते. दरम्यान, दुसऱ्या लाटेनंतर शासनाने अनलॉक केल्यानंतर जूनपासून महामंडळाने पुन्हा सर्व मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. परंतु, सध्या जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये पूर्वीप्रमाणे उत्पन्न येत नसले तरी, डिझेल खरेदीपुरते उत्पन्न येत आहे. त्यामुळे जळगाव विभागात सर्व आगारांमध्ये डिझेलचा साठा पूर्ण आहे.
इन्फो :
दररोज लागते तीस हजार लिटर डिझेल :
सध्या कोरोना काळात जिल्ह्यातील अकरा आगार मिळून दररोज तीस हजारांपर्यंत डिझेल लागत आहे. यात सर्वाधिक साडेचार हजार डिझेल हे जळगाव आगाराला लागत असून, यासाठी सरासरी २५ ते २६ लाखांपर्यंत खर्च येत असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
कोरोनाकाळात ६० कोटींचा फटका
महामंडळाच्या जळगाव विभागाचे दैनंदिन प्रवासी भाड्यातून येणारे उत्पन्न व विविध सवलतींचे मिळून दर महिन्याला ३० कोटींच्या घरात उत्पन्न येते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात यंदा एप्रिल ते मे महिन्यात महामंडळाची सेवा पूर्णत: बंद होती. यामुळे या दोन महिन्यांत ६० कोटींचे उत्पन्न बुडाले असल्याची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली.
इन्फो :
सर्व मार्गांवर बससेवा सुरू :
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यापासून महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. गेल्या महिन्यापासून तर सुरत, वापी, नवसारी, इंदौर या परराज्यातील मार्गावरही सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना सुविधेसाठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील कुठल्याही आगारात डिझेलच्या टंचाईमुळे बस बंद ठेवण्याची वेळ आली नसल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
अनलॉकनंतर महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नसले तरी, डिझेलचा खर्च निघेल, असे उत्पन्न येत आहे. उत्पन्न वाढीसाठी महामंडळातर्फे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेल्या मार्गावर जादा बस सोडण्यात येत असून, आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरही जादा बस सोडण्याचे नियोजन आहे.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग