कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून व्यापार क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून आता पुन्हा व्यापारावर निर्बंध सुरूच आहेत. त्यात हवा तसा जोरदार पाऊस नसल्याने आर्थिक संकट वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी कॅट संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दीड वर्षापासून व्यापार बंद असल्याने बँकांचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापारी, कर्मचारी यांच्यावर आर्थिक संकट गडद होत असून पूर्ण वेळ व्यापार सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे कॅट संघटनेने केली.
निवेदनावर कॅटचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा, संचालक रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली असून याचा विचार करण्यात येणार असल्याचे कॅट संघटनेला कळविले आहे.